रसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील करिअरच्या संधी

रसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. तसेच उज्ज्वल भवितव्य आहे. ज्यांना भारतात आणि परदेशात उच्चशिक्षण घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी रसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान हा एक चांगला पर्याय आहे. ह्या क्षेत्रामध्ये उत्तमपणे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यास प्रचंड संधी देशात तसेच जगभरात उपलब्ध होतात.
सध्या सुरवातीचा काही काळ जवळपास सगळ्याच शाखांमधील अभियंते व तंत्रज्ञांना संघर्षाचा जाणवत असेल; परंतु पुढे उत्तम काम केल्यास पगाराचे आकडे आणि कामाच्या संधी ह्या चांगल्या असतात. रसायन अभियांत्रिकी  क्षेत्रामध्ये रसायनशास्त्राचा व्यावसायिक पणाने  उपयोग करुन घेऊन मानवाच्या आवश्यक गरजा भागवतांना त्याचे आयुष्य अधिकाधिक सुखी, आरामदायी होण्यासाठी औद्योगिक कारखान्यांच्या उभारणीवर भर दिलेला आहे.


मानवाच्या विविध तर्हेच्या जीवनावश्यक गरजा उदाहरणार्थ, मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची निर्मितीसाठी लागणारी रासायनिक खते, तणनाशके, किटकनाशके, वस्त्र आणि निवारा निर्माण करण्या करिता लागणारी उत्पादने, कृत्रिमधागे, प्लास्टिक, पॉलीमर्स, फायबर्स, सिमेंट, प्लायवूड, हार्डबोर्डस वगैरे, तसेच मानवाचे आयुर्मान वाढिवण्यासाठी आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी औषधे, ड्रग्जची निर्मिती रसायन उद्योगां मध्ये केली जाते. इंधनाची समस्या
सोडविण्यासाठी खनिज तेल म्हणजे पेट्रोल व पेट्रोलियमजन्य विविध तऱ्हेच्या रसायनांचे उत्पादन केले जाते. वातावरणामध्ये होणारे कार्बन उत्सर्जन आणि वातावरणाचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये रसायन अभियंते व तंत्रज्ञांना करिअरच्या संधी मिळतात. ह्या साठी रसायन अभियंते व तंत्रज्ञ अणुऊर्जा, जैविक इंधन, इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रिया वापरून इलेक्ट्रीसिटीवर चालणाऱ्या आणि सध्या तसेच भविष्यात आवश्यक असणाऱ्या वाहनांसाठी बॅटेरिजचे मोठया प्रमाणावर उत्पादन, सुर्याच्या उष्णतेपासून व वायूपासून ऊर्जा निर्मिती ह्या मध्ये सक्रिय आहेत. मुलभूत कच्च्या मालापासून दर्जेदार, परवडणारी आणि पर्यावरणपुरक उत्पादने निर्माण करण्यासाठी रसायन उद्योगां मध्ये रसायनशास्त्रज्ञ, रसायन अभियंते व तंत्रज्ञ जबाबदाऱ्या पार पाडत असतात. कार्बनी, अकार्बनी सयुंगांपासून लक्षावधी रसायने उदाहरणार्थ, विविध ऍसिड ,अल्कली, इंडस्ट्रियल गॅसेस, नैसर्गिकवायू, पेपर, छपाईची शाई ,फोटोग्राफिक्स फिल्म्स, मॅग्नेटिक टेप्स व डिस्कस, कृषिजन्य पदार्थांवर आधारित खाद्यतेले, साखर, अल्कोहोल, डेअरी उद्योगांमधील प्रक्रिया, अन्नप्रक्रिया तसेच साबण, डिटर्जन्ट्स, कोळश्यावर आधारित रसायने आणि प्रक्रिया, देशाच्या सरंक्षणासाठी लागणारी स्फोटके, रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रांसाठी लागणारे इंधन म्हणजे प्रॉपेलन्ट तसेच रंगद्रवे आणि रंग, सौंदर्य प्रसाधने, रबरजन्य उत्पादने, काच निर्मिती प्रक्रिया, समुद्रातून काढलेली खनिजे, मिठ व त्यावरील प्रक्रिया इत्यादी. थोडक्यात म्हणजे, आपल्या दररोजच्या जीवनक्रमात लागणाऱ्या वस्तूंपैकी जवळपास ८० टक्के वस्तूंचे रासायनिक अभिक्रिया-प्रक्रियां द्वारे कारखान्यांमध्ये आवश्यक त्याप्रमाणात उत्पादन करण्यासाठी, रसायनशास्त्रज्ञ, रसायनअभियंते, तंत्रज्ञ व इतर विशिष्ट्य अभियंत्यांचा मोठा हातभार लागत
असतो. उदाहरणार्थ, सकाळच्या टुथपेस्टपासून ते रात्री डासांपासून बचाव करण्यासाठी लागणारे द्रव्ये, अगरबत्त्या इ.

मानवाकडून होणारे पाणी आणि हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी पध्दती व प्रक्रियांसाठी लागणाऱ्या उपकरणांचे डिजाईनसाठी रसायन अभियंत्यांची गरज भासत असते. शहरांतील नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुन्हा वापर करण्यासाठी तसेच त्याद्वारे नद्या स्वच्छ राखण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका जी काही सयंत्रे उभारतात त्यामध्ये सुद्धा रसायन अभियंत्यांना नोकरीच्या संधी मिळतात. रसायन उद्योगांमध्ये पदविकाधारक (Diploma) आणि पदवीधारक (Graduate) रसायन अभियंते व तंत्रज्ञ बी. ई. केमिकल इंजिनियरिंग / बी. टेक. केमिकल टेक्नॉलॉजी आणि त्यानंतर उच्च शिक्षण घेतलेले एम. ई. केमिकल इंजिनियरिंग / एम. टेक. केमिकल टेक्नॉलॉजी, पीएच. डी. धारक अभियंत्यांना संशोधन, नोकरी आणि व्यवसाय, सर्व्हिसेस, मार्केटिंग व विक्री ह्या स्तरांवर भरपूर वाव असतो.

निरनिराळ्या प्रकारच्या रासायन उद्योग क्षेत्रातील कंपन्यां मध्ये रसायनशास्त्रज्ञ, रसायन अभियंते व तंत्रज्ञ विविध जबाबदाऱ्यांवर नोकरी करतांना आढळुन येतात. उदाहरणार्थ :–

  1. संशोधन आणि विकास (आर. अँड डी.) इंजिनियर :- ह्या सम्बंधित विभागात तसेच केंद्रशासन संचालित संशोधन संस्थांमध्ये एम. ई. केमिकल इंजिनियरिंग / एम. टेक. केमिकल टेक्नॉलॉजी, पीएच. डी. धारक अभियंत्यांना संधी मिळतात. योग्य तो प्रॉडक्ट आणि योग्य प्रक्रिया शोधणे तसेच नवीन प्रॉडक्ट प्रकिये सहित विकसित करणे, वैय्यक्तिक स्तरावर, पेटंट, कॉपी राईट्स इ. द्वारे उत्पन्नाची हमी तसेच कर्तृत्वाची सुरक्षितता असल्याने कुशाग्र बुद्धीच्या
    अभियंत्यांना संशोधनासाठी जगभर कायम स्वरुपी मागणी असणार आहे.
  2. प्रोसेस डिजाईन इंजिनियर:– हा फक्त रसायन अभियंता आणि तंत्रज्ञ यांचा ग्रुप असतो. प्रिलिमिनरी डिजाईन पासून ते फायनल डिजाईन पूर्ण करण्यापर्यंतच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडायाच्या असतात.
  3. प्रोजेक्ट इंजिनियर किंवा प्रोजेक्ट मॅनेजर:- कारखाना उभारणीसाठी निवडकेलेल्या जागेवर प्रोसेस आणि मेकॅनिकल डिजाईनवर आधारित उपकरणांची, यंत्रांची स्थापना करुन प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात करून त्याचा दर्जा तपासून दाखवेपर्यंतच्या कामांचा ह्यात अंतर्भाव असतो.
    ह्याकरिता उभारणी (Procurement), संरचना बांधकाम (Construction) आणि क्रिया (Operations) पार पाडण्यासाठी अनेक कन्सल्टन्सीज भारतात आणि परदेशात आहेत.
  4. सुपरव्हिजन इंजिनियर- २४ तास अविरत चालणाऱ्या कारखान्यां मध्ये कुशल, अकुशल मनुष्यबळाकडून सुरळीत आणि औद्योगिक सुरक्षितता राखून मालाचे उत्पादन करण्यासाठी अनेक रसायन अभियंत्यांची गरज लागते.
  5. मार्केटिंग इंजिनियर:–जागतिक बाजारपेठेशी थेट जोडली गेलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमुळे उत्पादनांचे विक्री करण्याचे कौशल्य तसेच तयार झालेल्या उपपदार्थांवर चाचण्या करून दुसऱ्या उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा करणे ह्या साठी तंत्रज्ञानाच्या माहितीबरोबरच चांगले संभाषण कौशल्य (Soft Skills) असणाऱ्या रसायन अभियंत्यांची कंपन्यांना आवश्यकता असते.

रसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञाना मध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर काही विशिष्ट्य व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केल्यास रसायन अभियंत्यांना आणखी जास्त पगारावरील नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतांना आढळुन येतात. उदाहरणार्थ, पाईपिंग डिजाईन, सांडपाण्यावरील (Wastewater Treatment) उपकरणांचे व संयंत्राचे डिजाईन आणि त्यांची दुरुस्तीसह देखभाल, औद्योगिक सुरक्षितता (Industrial Safety), प्लांट कंट्रोल अँड ऑटोमेशन
(Process Control and Automation), जैविक प्रक्रिया (Bioprocesses), सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स, नॅनो-टेक्नॉलॉजी, कॉम्पुटेशनल फ्लुईड डायनॅमिक्स (CFD), कुत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) इत्यादी.

अध्यापनामध्ये (Teaching Field) रस असणाऱ्या उच्चशिक्षित रसायन अभियंते आणि तंत्रज्ञ ह्यांना अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठ अशा संस्थांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. रसायन निर्मितीच्या क्षेत्रात व्यवसाय सुरु (Startups) करण्यासाठी अथवा कन्सल्टंट इंजिनीयरिंगची स्वतंत्रपणे कंपनी सुरु करण्यासाठी काही वर्षांच्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवानंतर भारतासह इतर प्रगत देशांमध्ये संधी विस्तारतांना दिसत आहे. रसायन निर्मिती करणाऱ्या तसेच
देशाच्या सरंक्षणासंबंधी अनेक सरकारी उद्योगांमध्ये सुद्धा उदाहरणार्थ, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ओ. एन. जि .सी., स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया, नॅशनल अल्युमिनियम कंपनी, हिंदुस्तान इन्सेक्टीसाइड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, डी. आर. डी. ओ., अँम्युनेशन फॅक्टरीज, अणुऊर्जा विभाग (Department of Atomic Energy) इत्यादी. गेट प्रवेश परिक्षा (GATE) उत्तीर्ण झाल्यानंतर
पुढील निवड प्रक्रिये द्वारे नेमणूक झालेल्या अभियंते व तंत्रज्ञांना चांगल्या पगाराची सुरुवात मिळते. सध्या रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांनाच काही आठवडे / सहा महिने कंपन्यां मध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याचे प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये बंधनकारक केले आहे. त्याचा नोकरी मिळवितांना फायदा होतो.

परदेशांमध्ये संधी :- परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी शाखा निवड महत्वाची ठरते. त्या दृष्टिकोनातून रसायन अभियांत्रिकी हा एक उत्तम पर्याय दिसून येतो. एम. एस. व पीएच. डी. नंतर पुढील संशोधन करण्यासाठी ( डॉक्टरेट फेलोशीप ) भरपूर योजना आणि
शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. अमेरिका, यु. के. नेदरलँड, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी इत्यादी देशांमध्ये उच्चशिक्षित आणि अनुभवी रसायन अभियंते आणि तंत्रज्ञांना मोठ्या उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतात. आखाती देशांमध्ये अनुभवी रसायन अभियंते आणि तंत्रज्ञांना गलेलठ्ठ पगार मिळण्याच्या संधी प्राप्त होतांना आढळून येतात.

सारांश:- अन्य करिअर मार्गांचा विचार करता, अनेक यशस्वी करिअर्सपैकी रसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (Chemical Engineering and Technology ) हे एक उत्तम करिअर आहे ह्यात वादच नाही. ह्या क्षेत्रामध्ये अभियंते आणि तंत्रज्ञांना संशोधन, नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी जगभरात उपलब्ध होतांना दिसतात. (लेखक पुणे शहरातील एका प्रथितयश अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अध्यापन करतात)

लेखक: प्राध्यापक प्र.मो.वारके

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com