एआय वापरू सजगतेने

एआय वापरू सजगतेने; लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांचे राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त नव्या पिढीला मार्गदर्शन

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एआयच्या युगात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता तसेच त्याद्वारे मिळालेल्या माहितीची योग्य पडताळणी व विश्लेषणाचे कौशल्य. एआय अगदी चुटकीसरशी माहिती देईल, पण त्यातील सत्यता व योग्य काय ते निवडण्याची दृष्टी तुम्ही जाणीवपूर्वक विकसित केली पाहिजे.
तुमची पिढी ही डिजिटल विश्वातील पहिली पिढी आहे. म्हणूनच तथ्य पडताळणे, खोट्या बातम्यांपासून सावध राहणे व विचारपूर्वक मत बनवणे ही कौशल्ये आत्मसात करणे शैक्षणिक गुणांइतकेच महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाचा वापर जरूर करा, पण त्याचवेळी तंत्रज्ञानाकरवी तुमचा वापर केला जाणार नाही, यावरही लक्ष ठेवा.
एआयचा जमाना तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्यासाठी नवनव्या संधींचे महाद्वार उघडणारा आहे. मात्र यशाची गुरुकिल्ली एकच आहे ती म्हणजे सातत्याने ‘अपडेट’ राहणे व सजगतेने शिकत जाणे.

विजय बाविस्कर